विश्व सुपरमार्केट ते डी-मार्ट

साधारण ९६-९७ ची गोष्ट आहे. लातुरात ‘विश्व सुपरमार्केट’ या दुकानाने पहिल्यांदा सुपरमार्केट ही संकल्पना राबवली. अभिनेत्री सुकन्या कुलकर्णीने त्याचं उद्घाटन केलं होतं. ‘वर्ल्डस्पेस’ या सॅटेलाईट रेडीओवरील गाणी ऐकण्याचं सुख पहिल्यांदा विश्व सुपरमार्केटनेच लातूरकरांना दिलं होतं. औसा रोडवरील नंदी स्टॉप चौकातील सध्याच्या ‘विश्व सेल्स’ दुकानाच्या जागेत त्यांची पहिली शाखा होती. आज लातुरात सर्व प्रमुख रस्त्यावर त्यांच्या शाखा आहेत. हा काळ लातुरात इतर जगाच्या मानाने सावकाशीने बदलणारा होता. आजच्यासारखं जी ती वस्तू घरबसल्या मागवण्याची पद्धत नसल्यामुळे एकाच छताखाली गृहपयोगी वस्तू मिळण्याचं ते एकमेव ठिकाण झालं होतं.

सुपरमार्केट व पारंपारिक किराणा, भुसार व जनरल स्टोअर्समध्ये फरक असतो. निदान सकृतदर्शनी तसा फरक दिसून येतो. लातुरात जिथे गंज गोलाईसारखी मोठी व शंभर वर्ष जुनी बाजारपेठ असताना सुपरमार्केट का सुरू करावसं वाटलं असेल! ज्या काळात याची सुरूवात झाली त्यावेळी औसा रोड हा भाग विकसित होत होता. वस्ती वाढत होती. वाढत्या वस्तीत लोकांची गरज भागवणारी दुकाने वाढत होती. औसा रोडवरील आदर्श कॉलनी चौकातील दुकाने हे त्याचं चांगलं उदाहरण ठरावं. आज ‘औसा रोड’ हा भाग लातुरातला उच्चभ्रू/एलिट क्लासचा तसेच चकचकीत असणारा रोड झालाय.

तरीही सुपरमार्केट अवतरलं याला कारण सुपरमार्केटमध्ये असणाऱ्या विविध ब्रॅण्डसची रेलचेल. सर्वात मोठा फरक आहे पारंपारिक व सुपरमार्केटमध्ये ते म्हणजे गिऱ्हाईकाचा वस्तूंशी असणारा थेट संबंध. पारंपारिक खरेदीमध्ये घराजवळ असणाऱ्या किराणा/भुसार/जनरल दुकानात महिन्याचं सामान खरेदी करायला गेलेल्या गिऱ्हाईकाला दुकानदार त्याच्याकडील असलेल्या वस्तूतूनच हवी ती वस्तू निवडायला द्यायचा. त्यामुळे त्याच्याकडे असणाऱ्या वस्तूच घेणं गिऱ्हाईकाला क्रमप्राप्त होतं. किंवा इतर वस्तूंसाठी दुसऱ्या दुकानात जाऊन ती वस्तू विकत घ्यावी लागायची. त्यामुळे आपसूकच वस्तू निवडीवर मर्यादा पडायच्या. तसेच पारंपारिक दुकानदार विक्री होऊ शकेल त्याच वस्तू दुकानात ठेवायचा. त्यामुळे गिऱ्हाईकाला विशिष्ठ वस्तू हवी असल्यास ती मिळेलच याची शाश्वती नसायची. लातुरात ‘गंज गोलाई’ ही अशा पारंपारिक विक्रेत्यांनी भरलेली आहे. तिथे सर्व आर्थिक थरातले गिऱ्हाईक पाहायला मिळतात. जीवनावश्यक ते मोठ्या आकाराच्या वस्तूंचा व्यापार करणारं ते स्थान आहे. तिथे ठोक, किरकोळ, रिटेलर्स, डिस्ट्रिब्युटर्स ते स्टॉकिस्ट यांची दुकाने आढळून येतात. त्यात बांधकाम व्यावसायिक ते भाजीपाला विक्रेते सर्व जण व्यापार करत असतात. सोबतच रस्त्यावरील विक्रेते ते आलिशान ऑफिसात बसून कोटींच्या व्यवहार करणारे मोठे व्यावसायिक असतात. एकुणात बाजारपेठ असण्याला जे आवश्यक आहे ते तिथे आढळून येतं. पण वाढत्या लातुरातील नवीन वर्ग गंज गोलाईत गर्दीत फिरत खरेदी करेल ही शक्यता कमी व्हायला लागली होती.

त्यामुळे विश्व सुपरमार्केटची सुरूवात ही पारंपारिक किराणा-जनरल स्टोअर्सपेक्षा नक्कीच वेगळी होती. सुपरमार्केटमध्ये मिळणाऱ्या वस्तूंवर काही ना काही सवलत दिलेली असते. पण पारंपारिक दुकान असण्याला फाटा बसतो ते गिऱ्हाईकाला स्वतः हाताने वस्तू निवडता येते. सुपरमार्केटचा मालक किंवा कर्मचारी गिऱ्हाईकाने काय निवडावे किंवा नको ते सांगत नाही. त्यामुळे गिऱ्हाईक वस्तूवरील माहिती वाचून आपल्याला ती गरजेची आहे का नाही हे ठरवूनच ती खरेदी करता येऊ लागली. वस्तूंच्या किमती ते वजनानुसार त्याला ते निवडता यायला लागले. त्याच्या निवडीला भरपूर वाव राहायला लागला. पारंपारिक दुकानात हा वाव नसायचा. तसेच सुपरमार्केट कोणत्या वस्तूंची विक्री करते यावर त्याच्याकडे आकर्षित होणारा वर्ग आहे.

लातुरात सुरू झालेलं विश्व सुपरमार्केट हे किराणा, स्टेशनरी व जनरल स्टोअर्सचं एकछत्री आधुनिक दुकान होतं. यात गिऱ्हाईकाला हातात ट्रॉली घेऊन हवी ती वस्तू घ्यायची सोय होती. शांतपणे संपूर्ण दुकानात फिरून हवी तीच वस्तू त्याला घेता यायला लागली. तरीही सुरूवातीला इथे जाणार गिऱ्हाईक हा आर्थिक उत्पन्नात मध्यमवर्गापेक्षा थोडा वरच्या थरातला दिसून यायला लागला. मध्यमवर्गात वस्तू खरेदीत निवांत वेळ घालवणे पसंत नसावं कारण तो क्वचितच तिथे दिसायचा. त्याचा पारंपारिकपणे विक्री करणाऱ्या घराजवळच्या दुकानातल्या मालकाशी चार शिळोप्याच्या गप्पा मारत किंवा हुज्जत घालत खरेदी करण्याच्या आनंदाला मुकायचं नव्हतं.

हा बदल घडला ते काही वर्षांपूर्वी बिग बझारची सुरूवात झाली तेव्हा. इथे येणारा वर्ग हा गेल्या काही वर्षात उदारीकरणाचे फायदे घेणारा व मुंबई-पुणे-हैद्राबाद-बेंगळूरू इथे शिक्षणासाठी गेलेला सोबतच परदेशवारी केलेला. ज्याला तिथली मॉल संकृतीची सवय होती. वीकेंडला सुपरमार्केटमध्ये खरेदी करणे, त्याच्यासाठी घरच्यांना क्वालिटी टाईम देण्याचा मार्ग होता. तोच वर्ग किंवा काही वर्ष तिथे घालवलेला वर्ग आज बिग बझारमध्ये वेळ घालवायला लागला तो त्यामुळेच. बिग बझारने विश्व सुपरमार्केटपेक्षा एक पायरी वर राहायचं प्रयत्न केला तो खरेदीच्या शक्यता वाढवल्यामुळे. बिग बझारमध्ये असणारं कपड्यांचा खास दालन हे विश्व सुपरमार्केटला मागे टाकणारं ठरलं. याचा अर्थ इतकाच की गिऱ्हाईकांना अजून एक पर्याय उपलब्ध झाला. त्याची खरेदीची भूक वाढली.

आता डी-मार्टची सुरूवात ही वरील टप्प्यांचा पुढील भाग म्हणावा लागेल. डी-मार्ट हे ‘विश्व सुपरमार्केट’ व ‘बिग बझार’ चं मिश्रण दिसून येतं. दोन्हीतली चांगल्या गोष्टी घेऊन गिऱ्हाईकांना एकाच छताखाली सर्व जीवनावश्यक वस्तू मिळण्याची सोय त्यांनी केलीय. डी-मार्टचा पार्किंग लॉट त्याच्या व्यापाची झलक दाखवून देतो. गेल्या बऱ्याच वर्षात वाढलेला कार वर्ग व सद्य परिस्थितीत कार घेऊ न शकणारा पण खिशात बऱ्यापैकी पैसे असणारा वर्ग असे दोन प्रकारचे वर्ग तिथे मोठ्या प्रमाणात दिसून येतात. तसेच पुणे, सोलापूर, नांदेड व औरंगाबाद या ठिकाणी काही कामा निमित्ताने जाणारा हा वर्ग डी-मार्टच्या खरेदीने भारावून गेला होता. त्यामुळे इथे डी-मार्ट सुरू होणार ही बातमी ऐकल्यावरच लातूरकर खूष झाले होते.

तसेच त्यांचं बाजारभावापेक्षा स्वस्तात वस्तू देण्याच्या योजनेमुळे असेल मध्यमवर्गीयात त्याची लोकप्रियता बरीच दिसून येते. एकुणात विचार करता लातूरचं ‘व्यापारी शहर’ ही बिरूदावली हळूहळू बदलून ‘खरीददार शहर’ अशी व्हायला लागेल बहुदा.

पण डी-मार्ट नंतर पुढे काय? मॉल. येत्या काही वर्षात एखादा मॉल इथे सुरू होण्याची शक्यता डी-मार्टमुळे वाढीला लागलीय. शहराचा वाढता पसारा बघता तो ही लवकरच चालू होईल असं वाटतं.

Comments

  1. अतिशय सुदंर मांडणी आणि योग्य अभ्यासपूर्ण सदरर्भ सुरुवातीला लातूरचा कलखंड सचित्र डोळ्यासमोर दिसत होता हे आपल्या शब्दाचे आणि लेखन कौशल्याचे यश आहे...आपल्या ब्लॉकला खूप खूप शुभेच्छा...नावाप्रमाणे हा लातूरचा इतिहास घडवणारा ठरो...👍

    ReplyDelete
    Replies
    1. तुमची प्रतिक्रिया प्रोत्साहन देणारी आहे. माझी इच्छा आहे की आपणही लातूराविषयी यात लिहावे.

      Delete

Post a Comment