लातूर लोकसभा निवडणूक २०१९


येत्या १८ एप्रिलला लातुरात लोकसभेसाठी मतदान होईल. सर्वांनी मतदान करावं यासाठी लातूर निवडणूक आयोगाने वरील कल्पक जाहिरात तयार केली आहे. निळी शाई लावलेलं मतदान केलेलं बोट, १८ एप्रिल तारीख, १८ आकड्याला दिलेले शेड्स आणि उजव्या-डाव्या बाजूला जाड व वरती-खालती कमी जाड निळी बॉर्डर इतक्याच मोजक्या ऐवजांनी लक्ष वेधून घेणारी ही जाहिरात शिवाजी चौकात जिल्हा परिषदेच्या व पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनच्या आवारात लावलेली दिसते. जाहिरात बनवणाऱ्याचे कौतुक करायला हवे. मतदारांनी मतदान करावे हे सुचवणारी ही जाहिरात त्याच्या मिनिमल वापरामुळे आकर्षक झाली आहे. विचारी मतदाराला मतदानाची तारीख व मतदान करणे अनिवार्य आहे हा संदेश अचूकरीत्या मनात बिंबवण्याची हातोटी त्यात आहे.

इतकं असूनही मतदानाबद्दल एकूणच कंटाळवाणा सूर नेहमीच दिसून येतो. तो का याची चर्चा होणं गरजेचं आहे. त्याआधी काही आकडेवारी डोळ्यांखालून घालुयात.  
२०११ च्या जनगणनेनुसार लातूर शहराचं साक्षरतेचं प्रमाण ८४.22 टक्के आहे. त्यात ८८.९६ टक्के पुरूष व ७९.२० टक्के स्त्रिया आहेत. तरीही २०१४ च्या विधानसभाच्या निवडणुकीत फक्त २,०३,४४३ मतदारांनी मतदान केले आहे जे टक्केवारीत ६१.९८ इतके भरते. ही आकडेवारी सविस्तर देण्याचं कारण लातूरसारख्या स्वतःची विशिष्ठ ओळख प्रस्थापित करणाऱ्या शहराने निवडणुकीच्या वेळी मात्र ६१ टक्क्यांपर्यंतच मजल का मारावी? अगदी २०१४ च्याच लोकसभा निवडणुकीत फक्त १०,५७,१५६ मतदारांनी मतदान केलं म्हणजे ६२.६७ %. विधानसभा असो की लोकसभा ६० ते ६२ टक्क्यांच्यावर मतदान झालेलं दिसत नाही. कारणे बरीच असतील.
ती कारणे कोणती याची चर्चा करण्याआधी संविधानात मतदानाचा अधिकार कशा पद्धतीने विषद केला आहे ते बघूया.
Article 326 {Elections to the House of the People and to the Legislative Assemblies of States to be on the basis of adult suffrage}


The elections to the House of the People and to the Legislative Assembly of every State shall be on the basis of adult suffrage; that is to say, every person who is a citizen of India and who is not less than eighteen years of age on such date as may be fixed in that behalf by or under any law made by the appropriate Legislature and is not otherwise disqualified under this Constitution or any law made by the appropriate Legislature on the ground of non-residence, unsoundness of mind, crime or corrupt or illegal practice, shall be entitled to be registered as a voter at any such election.

संविधानातल्या आर्टिकल ३२६ नुसार भारतीय जनतेला मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे. जर संविधान आपल्याला मतदानाचा अधिकार देत असेल तर मतदान करणे हा आपला हक्क आहे. तरीही आपल्या इथे मतदानाबद्दल निराशा दिसून येते. ६० ते ६२ टक्केच मतदान होत असेल तर उर्वरित मतदार मत का देत नसतील याचा विचार होणं गरजेचं आहे.
मतदानाबद्दल सर्वाधिक प्रमाणात निराशेचा सूर दिसून येतो तो मध्यमवर्गामध्ये. आपला मध्यमवर्ग हा साक्षर आहे. तो मोठ्या प्रमाणात नोकरदार वर्गातला आहे. साक्षर असल्यामुळे त्याला वर्तमानपत्र व टीव्हीवरील बातम्या/चर्चा ऐकण्याची सवय आहे. या व्यतिरिक्त त्याचा विविध पक्षातील कार्यकर्ते, स्थानिक नेते यांच्याशी संपर्क असतो. नोकरीत प्रत्येक टप्प्यावर प्रशासनाशी संबंध येतो. त्यावेळी त्याला प्रशासनातला भ्रष्टाचार, नेत्यांचा प्रशासनातला नको इतका हस्तक्षेप, कामे करताना आपल्याच कार्यकर्त्यांना व लोकांना कामे मिळवून देणे, आपण मांडलेली समस्या नेत्याकडून प्रलंबित राहणे वगैरे गोष्टींना सामना करावा लागतो. व्यवस्थेची इत्यंभूत माहिती असल्यामुळे मतदान करून व्यवस्थेत काडीचा बदल घडणार नाही याची त्याला खात्री आहे. एकूण व्यवस्थेबद्दल अतिपरिचयात अवज्ञा झाल्यामुळे तो निराश झालेला दिसतो. परिणामस्वरूप तो मतदानावर बहिष्कार टाकतो. त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे तो दिवस आनंदात घालावतो. कारण मतदान न केल्याने त्याच्या नोकरीवर गदा येत नाही, त्याचा पगार बंद होत नाही किंवा कुणी त्याला जाब विचारत नाही. यामुळेच तो निर्ढावला आहे. अशा निर्ढावलेल्या अवस्थेत पोचलेल्या वर्गाकडून व्यवस्थेत बदल अपेक्षित नाही. पण बदल घडवू शकणारा असा हा मोठा वर्ग आहे. त्यामुळेच त्याचा निराशावादी/नकारात्मक सूर चिंतेत टाकणारा आहे.
एकीकडे व्यवस्थेत बदल होणं अपेक्षित आहे. भ्रष्टाचार कमी होणं गरजेचं आहे. लोकप्रतिनिधींनी प्रामाणिकपणे कामे करावीत. सोयीसुविधा मिळाव्यात. बेरोजगारीवर कमी करावी. रोजगार वाढावा. किमान जीवन सुखकर व्हावे अशी सर्वांची इच्छा असते. त्यासाठी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी लोकसभेत आपल्या मतदार संघाकरिता काम करेल अशी किमान अपेक्षा असते. ती रास्त आहे. पण आपण प्रामाणिकपणे मतदान करतो का? असा प्रश्न उपस्थित होतो. संविधानाने आपल्याला अधिकार दिला आहे तर त्याचा वापर करणे आपलं कर्तव्य आहे. तसेच एकीकडे आपण व्यवस्था बदलणे अपेक्षित आहे म्हणत असू तर मतदान केल्याशिवाय त्यात बदल कसा घडेल? हा साधा पण कळीचा प्रश्न आपण स्वतःला विचारला तर त्याचं उत्तर पण आपणासच मिळेल.
मग आपण मतदान करताना किमान कोणत्या गोष्टींचा विचार करावयास हवा? काही मुद्दे सुचवले आहेत कदाचित ते उपयोगाला येतील.
1.    ज्या पक्षाला मत द्यायचं आहे त्या पक्षाची विचारसरणी काय आहे हे आधी जाणून घ्यावे.
2.  आपण ज्या भागात राहतो त्या भागातल्या समस्या, सोयीसुविधा यांची जाण असणारा कोण उमेदवार आहे? त्याला राजकारणाचा अनुभव किती आहे? त्याचं पक्षांतर्गत प्राबल्य किती आहे? तो शिक्षित आहे की अशिक्षित याची माहिती घ्यावी. त्याच्या मुलाखती, त्याच्या कार्यकर्त्याशी संपर्क यातून त्याच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश पडेल अशी माहिती गोळा करावी.
3.   वर्षानुवर्षे एकाच पक्षाचा उमेदवार निवडून येत असेल तर त्यांनी मतदारसंघात पूर्वी काय कामे केली आहेत याची माहिती घ्यावी.
4.  सर्व पक्षांचे जाहीरनामे आवर्जून वाचावेत. जेणेकरून कोणता पक्ष कोणत्या गोष्टींना प्राधान्यक्रम देतो हे लक्षात येईल. आपण ज्या गोष्टींकरिता सतत तक्रारी करत असतो त्या गोष्टी त्यांनी जाहीरनाम्यात लिहिल्यात का किंवा भाषणातून, मुलाखतींमधून मांडल्यात का हे पहावे. भ्रष्टाचार, बेरोजगारी, रस्ते, पाणी, शेती, शिक्षण, आरोग्य, शेतकरी आत्महत्या, स्त्री-दलित अत्याचार या व इतर संवेदनशील विषयावर ते जाहीरनाम्यातून काय म्हणतात हे वाचावे.
5.   एखादा पक्ष खूप मोठ्या प्रमाणात प्रचार करत असेल तर त्याच्या प्रचाराला बळी पडू नये. प्रचार कितीही मोठ्या प्रमाणात केला तरी स्थानिक समस्या जाणणारा उमेदवार हा सरकार चालवणाऱ्या पक्षापेक्षा महत्वाचा असतो. स्थानिक उमेदवार लोकांशी संपर्क साधून असतो. त्याला आपल्या मतदारसंघात नेमकी कशाची कमतरता आहे याची जाण असते. भलेही तो आपल्याला न पटणाऱ्या पक्षाचा उमेदवार असला तरी. त्याची निवड करायची असल्यास स्थानिक समस्यांना तो किती महत्व देतो हे पहावे.

या व्यतिरिक्त व्यक्तिगत पातळीवर अजून काही मुद्दे असतील तर ते आपल्या समविचारी मित्रांशी चर्चा करून समजावून घ्यावेत. आपण मतदार म्हणून जितके सजग राहू तितके आपल्याला निवडीचे पर्याय उपलब्ध होतात. सजग राहण्यासाठी मात्र कान व डोळे सतत उघडे ठेवणं गरजेचं आहे. तेव्हा येत्या १८ एप्रिलला मतदान करायला विसरू नका.

Comments

Post a Comment