चिकित्सा : डॉ. आंबेडकरांच्या ‘हिंदुकरणा’ ची - सुहास पळशीकर

पुस्तक परिचय विक्रांत शंके

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मनु ही दोन वेगवेगळी टोके. मनुवाद हा विषमतेचा विचार मांडणारा, चातुर्वर्ण्याच्या आधारावर जातींची रचना करून तोच खरा सुदृढ समाज अशी मानवी समाजाची कल्पना करणारा तर बाबासाहेबांचा वैचारिक विरोध हिंदुधर्मातील चार्तुर्वर्ण्याला, जातव्यवस्थेतील विषमतेला, अस्पृश्यतेला. ही दोन्ही टोके समरसतेच्या नावाखाली एकत्र आणण्याचा प्रयत्न ऐंशीच्या दशकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने झाला. थोडक्यात हा प्रयत्न म्हणजे आंबेडकरांचे हिंदुकरण होय. याला मी आंबेडकरांचे भगवीकरण असंही म्हणेन. आता संघाला आंबेडकरांचे हिंदुकरण करण्याची गरज का पडली? याची कारणे शोधल्या नंतर आपणास याचा उलगडा हो शकतो. याचं प्रमुख कारण असे की, दलित समाजाची बनलेली व वाढत जाणारी अस्मिता आणि दुसरे म्हणजे आंबेडकरांनी सैद्धांतिक पातळीवर हिंदुधर्माला केलेला ठोस विरोध. कारणे समजून घेताना संघाच्या हिंदुत्वाची संकल्पना काय आहे हे पहावे लागेल.

संघाचे हिंदुत्व हे सतत भारतीय मुस्लिम आणि मुस्लिम अवकाशाभोवतीच घुटमळत राहिलेले आपणास दिसते. त्याच बरोबर भारताला हिंदुराष्ट्र संबोधत भगव्या प्रतिकांची मांडणी करून अस्मितांचे राजकारण ही सुद्धा संघाच्या हिंदुत्वाची दुसरी बाजू आहे. अशा प्रकारे या उदिष्टांना पोषक साधर्म्य साधणाऱ्या गोष्टींचं उदात्तीकरण प्रचार, प्रसार हा संघाचा नेहमीचा कार्यक्रम राहिलेला आहे. या कार्यक्रमा अंतर्गत डॉ. आंबेडकरांची हिंदुकरणाची प्रक्रिया त्यांनी राबवली. याचे अगदी तपशीलवार विवेचन पुराव्यासहित लेखक सुहास पळशीकर आपल्या पुस्तकात करतात. पुस्तकातील आशयाचा थोडक्यात आढावा घेत असताना आपल्या प्रिय नेत्याची किंवा समाजातील वस्तुस्थितीची समीक्षा कठोरपणाने करण्यास सिद्ध व्हावे लागेल.

ही दृष्टी हे पुस्तक प्रत्येक वाचकास बहाल करते. जसे की आंबेडकरांच्या हिंदुत्वाची कल्पना ऐंशीच्या दशकात आकार घेवू लागली होती आणि आंबेडकरांचे विचार हिंदुधर्माचे विचार यामध्ये अनेक पातळ्यावर कसे साधर्म्य आहे हे ओढून ताणून का होईना दाखविण्याचे प्रयत्न संघ परिवाराकडून जोमाने सुरू झाले. याची सुरूवात ९१ सालच्या डॉ. आंबेडकरांच्या जन्मशताब्दी निमित्ताने विचारयात्रानावाचा विशेषांक प्रकाशित केला. ज्याचे उपशीर्षक डॉ हेडगेवार ते डॉ. आंबेडकर : एक सामाजिक प्रवास असे होते. याला सुहास पळशीकर आंबेडकरांचे अपहरणअसे म्हणतात. यानंतर सामाजिक समरसता मंचाचे काम वेगात सुरू झाले. तेव्हापासून अगदी आजतागायत . भा. वि. ., समरसता मंच . संघटना १४ एप्रिल,डिसेबर या दिवशी आंबेडकर केंद्रित कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आयोजित करू लागल्या. आता गोळवलकर आंबेडकर जर एका मंचावर आणायचे असतील तर त्यांच्या विचारातील साम्यस्थळे शोधणे अपरिहार्य होते.

हिंदू धर्म हा संघ परिवाराचा श्वास तर हिंदू धर्माचा विरोध ही आंबेडकरांची मूलगामी भूमिका. या दोन्हींची आपल्या सोयीनी सांगड घालण्याचे प्रयत्न संघपरिवाराने विचारपूर्वक सुरू केले. यात त्यांना बऱ्यापैकी यश आलेलं दिसतंय. आंबेडकरांनी हिंदुधर्माचा त्याग केला ही गोष्ट संघाच्या या अपहरण कृत्याला अडसर ठरणारी गोष्ट होती म्हणून त्यांनी आंबेडकरांनी हिंदुधर्माचा त्याग केला पण मुस्लिम, ख्रिश्चन या धर्माचा स्वीकार केला नाही. त्यांनी बौध्द धर्माचा म्हणजेच हिंदुधर्माच्याच एका उपपंथाचा स्वीकार केला अशी मांडणी केली. यातून आंबेडकरांचे हिंदू प्रेम दाखविण्यावरच संघाचा भर दिसून येतो म्हणजे बौद्धधर्म हा वेगळा धर्म नाही तर हिंदू धर्मातच सुधारणा घडवून आणण्यासाठी निर्माण झालेला तो एक पंथ आहे अशी संघाने निर्माण केलेली धारणा.

पुढे जावून अस्पृश्यता निवारण आणि जाती प्रथेबद्दल बोलत असताना आंबेडकरांना जाती निर्मुलन अपेक्षित होते, किंबहुना आयुष्यभर त्यांनी त्याचाच ध्यास घेतला. समरसता मंचाच्या माध्यमातून संघ ही तेच काम करतोय हिंदुधर्मातील जाती प्रथा नष्ट होऊन अवघा हिंदू तेवढा एकत्र यावा अशीच संघाची भूमिका आहे. हे मांडण्याचा प्रयत्न संघाने सुरू केला. पण जाती निर्मुलनाबद्दल बोलत असताना बाबासाहेबानी त्यांच्या Annihilation of Caste या पुस्तकातजाती तोडताना आपणांस प्रथम जातीला धर्माने दिलेला पावित्र्यतेचा दर्जा काढून घ्यावा लागेलअसे म्हणतात किंवा जाती निर्मुलनासाठी आंतरजातीय विवाहाचा कार्यक्रम देतात. या विषयी संघ काहीच सांगत नाही. या ठिकाणी आंबेडकरांना जाती निर्मुलन आवश्यक वाटत होते पण ते हिंदू एकतेसाठी नाही, हे लक्षात घ्यायला हवे. याची मीमांसा संघ नेमक्या उलट अर्थाने करतो. त्यानंतर हिंदुत्व आणि आंबेडकरांच्या विचारातील साधर्म्य शोधत असताना त्यांना भारतीय मुस्लिमांच्या संदर्भातील आंबेडकरांचे तत्कालीन विचार म्हणजे जणू कर्णाची कवच कुंडलेच वाटतात. किती ही पलटवार होवू द्या आतला माणूस सुरक्षित. यात संघ परिवार बाबासाहेबांच्या 'Pakistan or partition of India' या पुस्तकातील अवतरणे द्यायला चुकत नाही.

ज्याअर्थी आंबेडकरांनी भारतीय मुस्लिम समाजाबद्दल प्रतिकूल विश्लेषण केले. त्यामध्ये हिंदु आणि मुस्लिम एकत्र राहू शकत नाहीत. त्यांचं भवितव्य वेगळं आहेत किंवा मुस्लिम हे मागासलेले, धर्मांध आहेत अशी त्यांनी केलेली टिप्पणी. आंबेडकरांची काय भूमिका ही सर्व कटकट मिटवा एकदाचा काय तो निकाल लागू द्या.’ या पठडीतली होती. ही बाब पळशीकर प्रस्तुत पुस्तकात अधोरेखित करतात. मात्र याचा आधार घेत आंबेडकरांचे मुस्लिम विषयक मते संघाचे विचार यात कमालीचा सारखेपणा आहे असे चित्र उभे केले जाते. यातील तथ्य हा अभ्यासाचा विषय आहे. फाळणीच्या वेळेस पाकिस्तान एकदाचे मुस्लिम लीगच्या लोकांना देऊन टाकावे या आंबेडकरांच्या भुमिके मागे दोन तत्वे आहेत. एक देशाची सुरक्षितता दुसरे स्वयंनिर्णयाचे तत्व. तुम्हांला जर भारतीय मुस्लिमांबद्दल निर्णय घ्यायचा असेल तर त्यांनाच तो निर्णय घेऊ दिला जावा त्यांची इच्छा जर स्वतंत्र पाकिस्तानची निर्मिती असेल तर ती असावी असा आंबेडकरांच्या विवेचनामागचा हेतू होता. संघ परिवार याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष करतो

बाबासाहेब या प्रश्नावर पाकिस्तान देऊन टाकावे हा एकमेव पर्याय सांगत नव्हते तर १९४० साली त्यांनी 'Thoughts on Pakistan' लिहिल्या नंतर सन १९४५ मधे त्यांनी Communal Deadlock: the way to solve it.' हा निबंध लिहिला. यामध्ये आंबेडकरांनी अल्पसंख्याकांना पुरेसे आधिकार कसे देता येतील याची भारताच्या संदर्भात चर्चा केली आहे. त्याच बरोबर जागतिक संदर्भात ते आफ्रिका, कॅनडा इ. देशांचे संदर्भ देऊन अल्पसंख्यांक हे बहुसंख्याकां बरोबर एकत्र नांदू शकतात असे प्रतिपादन आंबेडकरांनी केले. एकूणच होता होईतो विभाजन टाळावे असाच बाबासाहेबांचा हेतू होता हे संघपरिवार पुढे आणत नाही. बाबासाहेबांना भारताचे जे सांस्कृतिक वैविध्य होते ते सुद्धा जपायचे होते. आणि समग्र भारतीय सांस्कृतिकतेचा विचार करता मुस्लिमांचं जे कल्चर आहे ते वगळता येत नाही, हे सुज्ञास सांगणे लगे. पळशीकर बाबासाहेबांच्या विचाराची चिकित्सा धर्मपरिवर्तन फाळणी संदर्भातच करून थांबत नाहीत तर बाबासाहेबाच्या हिंदु विषयीच्या मताचाही दाखला देतात. यात पळशीकर हे नमुद करतात की,हिंदुस्तान हिंदूंचा ही घोषणा केवळ उद्घटपणाची नाही तर टोकाच्या मुर्खपणाची आहे.' असा आंबेडकरांचा अभिप्राय आहे. हिंदू राज हा सर्वात देशाला मोठा धोका आहे असेही ते सांगतात.चिकित्सा : डॉ. आंबेडकरांच्या हिंदुकरणाचीया पुस्तकात पळशीकर अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने अगदी तपशीलवार दाखले देत आंबेडकरांची हिंदू विषयक तत्कालीन तसेच काळाप्रमाणे बदलत गेलेली मते आंबेडकरांनी केलेले धर्मांतर याचा आढावा घेतात.

आंबेडकरांच्या हिंदुविषयक धारणांचा काही ठिकाणी उल्लेखित मुस्लिम विषयक प्रतिकूल मतांचा विपर्यास संघ परिवाराने कसा केला हे ही दाखवू देतात. यामध्ये पळशीकर आंबेडकरी चळवळीला दोष द्यायला चुकत नाहीत. मला वाटत ते योग्यच आहे. आंबेडकरवादी परिवर्तनवादी चळवळीच्या नाकर्तेपणामुळेच संघ परिवाराला आंबेडकरांचे हिंदू विचार संघ समावेशक असल्याचे दाखविण्याची हिंमत झाली. वैचारिक पटलावर आंबेडकरांच्या विचारांचं भगवीकरण होणं ही दलित, बहुजन परिवर्तनवादी चळवळींच्या आक्रमकतेची धार कमी करून परिवर्तनाच्या रथाला खीळ घालणारी बाब आहे. यातून संघ परिवाराला प्रतिकांच्या राजकारणातून यश मिळेल असं नाही तर आंबेडकरांच्या हिंदू विषयक मतांचा विपर्यास झाल्याने आंबेडकरांच्या वैचारिक गाभ्यालाच धक्का पोचेल. हे थांबवायचं असेल तर आपण वेळीच सावध झालं पाहिजे. संघ परिवाराकडून सातत्याने होत असणारा कट्टर हिंदुत्वाचा जागर बघत मुग गिळून शांतपणे आपल्या घरात बसलेल्या पुरोगामी चळवळीच्या कार्यकर्त्याच्या डोळ्यात अंजन घालणारं प्रभावी पुस्तक.

प्रकाशक : हरिती प्रकाशन, पुणे

(लेखक व पुस्तकाची अधिक माहिती मिळवण्यासाठी अनुक्रमे विक्रांत शंकेहरिती प्रकाशन या शब्दांवर क्लीक करावे.)





Comments